बंद

पुण्याविषयी

भौगोलिक स्थान, विस्तार व आकार

भौगोलिक स्थान

पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हयाच्या सीमेस उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा तसेच वायव्येला ठाणे जिल्हा आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे: : “घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”. पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.

पुण्याचे हवामान

हवामान

पर्जन्यवितरण- पुणे जिल्हयाच्या भौगालिक रचनेनुसार पुणे जिल्हयात पर्जन्याचे वितरण समसमान नाही. जिल्हयाचा पश्चिम भाग जंगलांनी व्यापलेला असल्यामुळे या भागात पुर्वेकडील भागापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. येथील बराचसा पाऊस हा उन्हाळयात वाहणा-या नैऋत्य मान्सून वा-यांमुळे येतो व या महिन्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण सुमारे 87 टक्के असते. जुलै व ऑगस्ट या महिन्यात पर्जन्याची तीव्रता जास्त प्रमाणात असते. वेल्हा, मुळशी आणि मावळ या तालुक्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण जास्त असते. भोर, आंबेगाव, जुन्नर, खेड, हवेली व पुणे शहर या तालुक्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण मध्यम असते. शिरुर, दौंड, इंदापूर आणि बारामती हे तालुके कमी पर्जन्याचे, कोरडे व शुष्क भागात येतात.एप्रिल व मे या महिन्यांमध्ये पुणे जिल्हयात सर्वात जास्त तापमान असते. जिल्हयाचा पश्चिम भाग उदा.जुन्नर, आंबेगाव,खेड, मावळ, मुळशी आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये तापमान थंड असते. परंतु जिल्हयाचा पुर्व भाग उदा. शिरुर, दौंड, बारामती आणि इंदापूर हे तालुके कोरडे व जास्त तापमान असणारे आहेत. डिसेंबर व जानेवारी या महिन्यांमध्ये तापमान 11 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाते. उन्हाळयामध्ये बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. या काळात आर्द्रतेच्या प्रमाणात विविधता आढळून येते. रात्रीच्या वेळी तापमान कमी असल्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे द्रवात रुपांतर होते आणि दिवसा तापमान जास्त असते.